Ad will apear here
Next
झपूर्झा...


अण्णू गोगट्या आठवतोय? इलेक्शनला उभा राहून अण्णू गोगट्या इतक्यांदा पडला, की विहिरीत पोहरा पडला तरी, ‘पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे’ असं अंतूशेट म्हणत असे. म्हणजे अण्णू गोगट्या ही कुणी व्यक्ती असण्यापेक्षा ‘अण्णू गोगट्या होणे’ ही कन्सेप्ट जास्त महत्त्वाची आहे, हे आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या ‘पुलं’ लक्षात आणून देतात.

तशीच आमच्या भटक्या मित्रमंडळींच्या कंपूत ‘पटेल टूर्स’ नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे सामान्यतः पटेल, शहा आणि मंडळी किंवा आपल्याकडे जोशी, कुलकर्णी, देशपांडे जिथे सहकुटुंब सहपरिवार टूर कंपन्यांबरोबर फिरायला जातात, त्याला आमच्याकडे पटेल टूर्स म्हणतात. ‘आपण पटेल टूर करायची नाही’ या वाक्याचा आम्हा सर्व भटक्या कंपूवर इतका पगडा आहे, की कुणी ‘गेल्या दहा वर्षांत सीमा टूर्सबरोबर महाबळेश्वरला गेलो नाही रे..’ असं कुणी म्हटलं तरी त्याला स्वखर्चाने हे भटके हिमालयात पाठवतील...!

म्हणजे महाबळेश्वर, माथेरान किंवा तत्सम लोकप्रिय ठिकाणं आवडत नाहीत असं नाही, पण रुळलेल्या वाटा सोडायच्या आणि आडवाटेने जात जात खऱ्या भटकंतीचा आनंद लुटायचा अशी ‘जित्याची खोड!’



आमच्या या भटक्या जमातीच्या याच अध्यादेशाचा आदर करत आम्ही हिमाचल प्रदेशात जाऊन सिमला पाहिलेलं नाही. कर्नाटकात जाऊन कोस्टल कर्नाटक आणि हिल्स ऑफ कर्नाटक यांना दूर लोटलंय; कर्नाटकातली आणि हंपी, बदामी, पदक्कळ, ऐहोळे अशी एकापेक्षा एक सरस ठिकाणं फिरलोय. एका अमेरिका ट्रिपनंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, नायगारा या टूर कंपनी ठिकाणांचा वेळ कमी करून न्यू हॅम्पशायरचे फॉल कलर्स पाहत रंगीबेरंगी मेपलची पाने गोळा करत फिरलोय....



अशीच एक भटकंती प्लान केली. उत्तराखंडातल्या कुमाऊ भागात! नैनितालला फक्त ‘मम’ म्हटलं आणि आम्ही पुढे निघालो. पुढचे दोन दिवस चौकोरीमार्गे मुन्सियारी असा वीस तासाचा ‘पहाडी’ प्रवास करत आम्हाला पोहोचायचं होतं. प्रवास खूप खडतर, पण अत्यंत रमणीय होता. रामगंगा नदीच्या किनाऱ्याने आम्ही जात होतो. नैनितालची सहा हजार फुटांवरची डोंगररांग मागे सरली आणि प्रचंड पहाड समोर आला. सह्याद्रीच्या उंचीला सरावलेली नजर या हिमालयाकडे पाहून अक्षरश: थक्क होऊन गेली. साडेअकरा हजार फुटावरच्या मुन्सियारी पर्वतरांगांत पोहोचेपर्यंत आम्ही हिमालयाचं कधी भव्यदिव्य, तर कधी मोहविणारं, तर कधी रौद्रभीषण रूप पाहत होतो. दिवाळीनंतरचे दिवस होते. त्यामुळे हॉटेलवर पोहोचलो तेव्हा लवकर सूर्यास्त होऊन दिवस मावळला होता.



सकाळी लवकर जाग आली. आमच्या हॉटेल रूमला दोन भिंतींना मिळून ‘इंग्रजी एल’ आकाराचं भलंमोठं ग्लासडोअर होतं. त्यावरचा सुंदर पांढराशुभ्र पडदा सरकवला आणि पलीकडे दिसणाऱ्या दृश्याने मी अक्षरश: वेडी झाले!! भिंतीला वॉलपेपर लावून कृत्रिमपणे नटवलेलं चित्र पाहणारे माझे डोळे निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेलं जिवंत चित्र पाहत होते. ‘पंचचूली माउंटन्स’ नावाने ओळखली जाणारी हिमालयाची गगनचुंबी डोंगररांग आम्ही पाहत होतो.



लहान मुलांच्या चित्रात असते तशी उलट्या ‘व्ही’ आकाराची टोकदार डोंगररांग... पाच टोकेरी शिखरं.. म्हणून पंचचूली..!

या प्रवासात कालामुनी टॉप या ११ हजार फुटांवरच्या मार्गावर या पंचचूलीचं दर्शन दुरून पहिल्यांदा झालं असलं, तरी या मुन्सियारी गावात म्हणजे आम्ही तिच्या पोटातच शिरलो होतो.

नंदादेवी टेम्पलला आलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. वर कडक ऊन असूनही, स्वेटर काढवत नव्हते. ऊन जाणवतच नव्हतं! नाही तरी हिमालयातल्या उन्हाचा उपयोग फक्त आपली सावली पाहण्याकरिता..! सावली दिसली नसती तर आपल्यासारखे मुंबईकर त्याला ऊन म्हणायला तयारही झाले नसते..!!



असो.. तर ही नंदादेवी म्हणजे पार्वती.. हिमालयाची कन्या! शंकराच्या प्राप्तीकरिता तिने तपश्चर्या केली तेच हे ठिकाण होतं...तिचं माहेर होतं! नंदादेवीच्या समोर पंचचूलीचे पाच हिमाच्छादित सुळके सूर्यकिरणात तळपत होते. या पंचचूलीच्या पलीकडे शंभर किलोमीटर अंतरावर या पार्वतीचं सासर.. म्हणजे कैलास मानसरोवर होतं!!

त्याच कैलासपतीसाठी नंदादेवी पार्वती येथे तपश्चर्या करत होती. आणखी एक कथा अशी -स्वर्गारोहण करताना पांडव बद्रिकेदार करून याच भागात आले आणि स्वर्गारोहणापूर्वी पांडवांनी पाच चुली मांडल्या. त्याच या पंचचूली!

क्षणाक्षणाला शिखरांचं रूप बदलत होतं! लाल, केशरी, पिवळ्या रंगांची नुसती उधळण सुरू होती; आणि सूर्यास्तानंतर फिके गुलाबी होत होत ती शिखरं स्फटिकासारखी शुभ्र होत होती.

कोणत्याही हिल स्टेशनसारखी गर्दी नाही.. माणसं नाहीत.. हॉटेल्स नाहीत.. शॉपिंग नाही.. इथे होती ‘मी’पण विसरायला लावणारी शांतता.. भव्यता.. आणि एकांत!! या सगळ्यांचे साक्षीदार होतो आम्ही फक्त सहा जणं आणि तो भव्य हिमालय!!

‘इतने दूर नेपाळ, चायना और इंडिया के बॉर्डर पे बहुत कम टुरिस्ट आते है। और मुंबई से आनेवाले तो नैनिताल होके वापस चले जाते है।’ आमचा ड्रायव्हर निघताना म्हणाला....

त्याचं हे वाक्य ऐकून मी गुणगुणत होते...

व्यर्थी अधिकची अर्थ वसे
हे ज्यास दिसे
त्या म्हणती पिसे
त्या अर्थाचे बोल कसे?
झपूर्झा... गडे झपूर्झा....

- डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZUSCM
Similar Posts
‘सतेज’ शरयू आणि अद्भुत ‘त्रिशूळ’ बैजनाथ या शिवमंदिराच्या कळसाच्या पलीकडे दूरवर या शिवाचा त्रिशूळ दिसत होता. त्रिशूळ... हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांतलं शिखर! भगवान महादेवाचं हे शस्त्र... उंच आकाशाला भेदत होतं. सूर्यप्रकाशात तेजाळत होतं! त्रिशूळ इतका महाकाय, इतका दिपवणारा होता, की मनात आलं... एक शस्त्र म्हणून याला धारण करणारा महादेव कसा असेल! देवांचाही देव
राजगड ट्रेकचा नितांतसुंदर अनुभव आठवणीतल्या राजगड ट्रेकचा नितांतसुंदर अनुभव शब्दबद्ध केला आहे डॉ. अपर्णा बेडेकर यांनी..
वेरूळ येथील कैलास मंदिराची एक नाही, तर दोन आश्चर्ये!! वेरूळ येथील आठव्या शतकातील, हे एकाच प्रचंड खडकातून वरून खाली खणत आणलेले कैलास मंदिर (लेणे), हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक आश्चर्य आहेच... पण त्या मंदिराचे, त्याशिवाय अजूनही एक आश्चर्य आहे, ते म्हणजे, ते मंदिर घडवताना निघालेल्या तब्बल ४० कोटी किलोग्रॅम (!!!) दगडाचे पुढे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही
Hindu and Jain temples of Abhapur - Intricate Windows Intricate जाली windows at the Jain temple of Abhapur, in Polo Forests. Every single jaali is different from another. No pattern is repeated. Think of the creativity involved, the strategic design thinking that must have gone into this. The play of light and shade is so intriguing. Chiaroscuro they call

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language